Sunday, 14 January 2018

भागपूर प्रकल्पाचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार - जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन





            जळगाव दि. 14 :- पहूर परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या सुमारे एक हजार 400 कोटी रुपयांच्या भागपूर प्रकल्पाचे भूमीपुजन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती  वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज पहूर  येथे दिली.

पहूर येथे गाळरोधक बंधारा 56 लाख रुपये, काँक्रीटचे रस्ते वार्ड क्रमांक 3 मध्ये 10 लाख, वार्ड 6 मध्ये 10 लाख, खर्णाने रस्ता 59 लाख, पहुर कसबे  रस्ता 10 लाख, दुय्यम निबंधक कार्यालय आदि विविध विकास कामांचे उद्घाटन ना. महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अनिल देशमुख, पहूर कसबे गावाचे सरपंच ज्योती धोंगडे, पहुर पेठचे सरपंच प्रदीप लोंढा, बाबुराव धोंगडे हे होते.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, लोकांची कामे सुलभ होण्यासाठी शासन विविध योजना कार्यान्वीत करीत आहे. माहिती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर शासकीय कामकाजात होतांना आपण पाहत आहे.  नागरिकांना सुविधा गावपातळीवरच उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यात आले आहे.  या परिसरातील नागरिकांची सातत्याने या कार्यालयाची मागणी होती. ती आज पूर्ण होत आहे. परिसरातील नागरिकांची सोय यामुळे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या कारकिर्दीत या कार्यालयास मंजूरी दिल्याबद्दल त्यांचे ऋणनिर्देशही  त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले की, पहुरवासियांची नगरपंचायतीचा प्रस्ताव, तसेच जागा उपलब्ध करुन दिल्यास तलाठी कार्यालय सुरु करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्तविकात सह जिल्हा निबंधक आर. एम. पाटील यांनी कार्यालय सुरु करण्यामागील पार्श्वभूमी विषद केली.

त्यापूर्वी ना. गिरीश महाजन, मान्यवरांच्या यांच्या हस्ते वाघुर नदीवरील गाळरोधक बंधाऱ्याचे भूमिपुजन तसेच एकुलती रस्त्याचे भूमिपुजन तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पहूर व परीसरातील विविध गावांचे सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment