जळगाव, दि. 31 - अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण अथवा इतर बाबींसाठी आर्थिक सहाय
मिळावे. याकरीता विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्ह्याचे
जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हळुंगे-बालेवाडी, पुणे
यांचेकडे 7 फेब्रुवारी, 2018 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व
युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
राज्यात
क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच
राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते
खेळाडू तयार व्हावेत. यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडुंच्या
दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना
अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेवून क्रीडा धोरण-2012 तयार करण्यात
आले आहे. या अतंर्गत महाराष्ट्रातील खेळाडूंना
आर्थिक सहाय्य देणेचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयानुसार अधिकृत
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा
प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश, विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण
उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क,
आधुनिक क्रीडा साहित्य आयात व खरेदी करणे, गणवेश इत्यादीसाठी खेळाडूंना अर्थसहाय्य
देण्यात येते.
या
योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा,
राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. विश्व अजिंक्यपद
स्पर्धा, शालेय आशियाई/ जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन
स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या स्पर्धांना
अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये
ज्या खेळ/क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. तेच खेळ/ क्रीडा प्रकार नमुद इतर
स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय असणार आहे. मात्र कबड्डी, खो-खो,
मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद या शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.
या योजनेच्या अधिक माहितीकरिता जिल्ह्याचे
जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील कार्यालयाशी ( दुरध्वनी
क्रमांक - 020-27390371, विस्तारीत क्र 214) वर संपर्क करावा. असे उपसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment