जळगाव दि. 8 :- बेटावद ते
मुसळी फाटा हा रस्ता केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग घोषित केला असून या
रस्त्यावर धरणगाव शहरात वाहतूकीची कोंडी होवू नये. यासाठी या रस्त्याला धरणगाव
शहराजवळ
बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
यांनी दिली.
सोनवद ता. धरणगाव येथील अंजनी नदीवर 1 कोटी 33 लाख रुपये खर्चून बांधण्यात येत
असलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन ना. पाटील यांच्या हस्ते संपन्न
झाले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी
अभियंता मोराणकर, उपअभियंता ए. जे. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,
पवन सोनवणे, धरणगाव पंचायत समितीचे उपसभापती हेमराज पाटील, तहसीलदार श्री. राजपूत,
गटविकास अधिकारी जाधव, तालुका प्रमुख गजानन पाटील, नानाभाऊ सोनवणे, संजय पाटील आदी
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ होते.
यावेळी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले, पावसाळ्यामध्ये अंजनी नदी पार
करतांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. या पुलामुळे
नागरिकांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अंजनी नदीवर सोनवद येथे
असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 30 लाख
रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या बंधाऱ्यामुळे सोनवद भागात पाण्याची
साठवणूक होणार असून गावातील नागरिकांना व जनावरांना या पाण्याचा फायदा होणार आहे.
त्याचबरोबर या पुलाची लांबी 72 मीटर असून संपूर्ण काँक्रीटीकरणातून बांधण्यात
येणारा हा जिल्ह्यातील पहिला पुल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धरणगाव-जळगाव ग्रामीण मतदार संघातील विविध गावांमध्ये अनेक लोकोपयोगी कामे सुरु असून
या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर धरणगाव शहरात पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, फिल्ट्रेशन प्लॅन्ट आदि
कोट्यावधी रुपयांची काम सुरु आहे. शहरवासियांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन
देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. धरणगाव शहरात 2 कोटी रुपये खर्चून स्मशानभूमीचे काम
पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पिंपळेसीम ते हिंगोणा या रस्त्याचे 2.5 कोटी रुपयांचे
काम मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, गजानन पाटील
आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सोनवद परिसरातील विविध गावांचे
सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment