Saturday, 27 January 2018

महसुल कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार - ना. गुलाबराव पाटील



         




        जळगाव, दि.27 - महसुल विभाग हा गोरगरिबांची सेवा करणारा विभाग असून शासनातील अतिशय महत्वाचा असणाऱ्या महसुल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
      येथील अल्पबचत भवनमध्ये जळगाव जिल्हा महसुल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने  राज्यस्तरीय कार्यकारीणी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून राज्यमंत्री श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, तहसीलदार अमोल निकम, राज्य कार्यकारीणीचे डी. एम. अडकमोल यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
              याप्रसंगी बोलतांना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, महसुल विभागात तलाठी ही अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. महसुल विभागातील कर्मचारी हे गोरगरीब नागरीकांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत झटत असतात. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालय स्तरावर  पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
आपण सर्व लोकसेवक आहोत याची जाण ठेवणे आवश्यक -  जिल्हाधिकारी
लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करीत असतांना आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना आपण सर्वांनी मनामध्ये ठेवून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करीत असतांना प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळया असतात. त्या सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  
       यावेळी संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचारी, वैद्यकीय कारणास्ताव अपात्र असणारे कर्मचारी व स्वेच्छा निवृत्ती घेणारे कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अनुकंपा तत्वावरीलसेवा भरती विनाअट करावी. गट ड संवर्गातील इतर कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने 14 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयातील अट क्र.5 रद्द करणेबाबत. सन 2005 पासूनची चतुर्थश्रेणी कर्मचारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुन्या पध्दतीने चालू करावी. कोतवालांना पेन्शन योजना लागू करावी. अशा मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री श्री. पाटील यांना दिले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डी. एम. अडकमोल यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          या कार्यक्रमास राज्य कार्यकारीणीचे व जिल्हा कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी, तसेच महसुल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment